न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- कर्करोग होण्याचा धोका असल्याची शक्यता लक्षात घेउन मधुमेहाच्या रुग्णांना दिली जाणारी एक गोळी परत मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मधुमेह अर्थात डायबिटीसच्या रुग्णांना सामान्यत: ही गोळी दिली जाते. मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड हे गोळीचे नाव आहे.
कर्करोग अथवा कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे प्रमाण यात जास्त असल्याचा दावा काही प्रख्यात माध्यमांनी सूत्रांच्या आधाराने दिलेल्या बातमीत केला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही हा दावा केला होता. डायबिटीसच्या या गोळीतील कॅन्सरला कारक ठरणाऱ्या निट्रोसोडिमेथीलॅमाइन (एनडीएमए) या घटकाचाही त्यांनी उल्लेख केला होता.
दरम्यान, हा खुलासा झाल्यानंतर संबंधित गोळ्या बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही जून महिन्यात एका बॅचच्या गोळ्या अशाच परत बोलावण्यात आल्या होत्या. मार्कसन्स फार्मा या कंपनीचे हे औषध बाजारात टाइम कॅप लॅब नावाने विकले जाते. बाजारातून ५०० एमजी आणि ७५० एमजीच्या गोळ्या माघारी घेतल्या जात असून यापेक्षा कमी एमजीच्या गोळ्या धोकादायक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.


















