- पिंपरी चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष विलास कुटे, किरण पवार, आर. के. पुणेकर व पदाधिकाऱ्यांच्या मागणीस यश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मोरवाडी येथे न्यायालयाचे दिवाणी, फौजदारी व तस्तम न्यायालयाचे कामकाज मोरवाडी येथून चालते. पुणे न्यायालयास खंडपीठाचा दर्जा देण्यासाठी पुण्यातील वकिलांनी मागील काही वर्षात मोठे आंदोलन उभे केले होते. परंतु, पिंपरी चिंचवड येथील नागरिकांकरीता मोरवाडी येथील जे न्यायालय आहे ते भाडेतत्वावर आहे.
याची तात्कालीन पिंपरी चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष विलास कुटे, किरण पवार व आर. के. पुणेकर व पदाधिकाऱ्यांनी दखल घेत राज्य सरकारकडे नूतन इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास अंतिमतः यश आले व राज्य शासनाने न्यायालयाच्या इमारतीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोशी, बो-हाडेवाडी येथील पेठ क्रमांक १४ मधील ६ .५७ हेक्टर म्हणजेच १५ एकर जागा न्याय संकुलासाठी मंजूर केली आहे.
परंतु, न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही. तथापि, पिंपरी-चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अजमेरा सोसायटी येथील महापालिका शाळेसाठी बांधलेल्या इमारतीमधील जागेची मागणी केली होती. महापालिकेने देखील जागा देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता.
त्यामुळे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील जागा न्यायालयासाठी निश्चित करण्यात आली. त्यासाठी ८ लाख ७७ हजार रुपये भाडे प्रतिमहिना पाच वर्षासाठी आकारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. ४) रोजी मान्यता दिली आहे.












