न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज बुधवारी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
महापौर ढोरे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील उपमहापौर पद कोणाला मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शहरातील काही ठेकेदारांनी उपमहापौर हिंगे यांच्याबाबतच्या तक्रारी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांना प्रदेशाध्यक्षांनी हिंगे यांचा राजीनामा स्वीकारण्यास सांगितले होते. त्यामुळे हिंगे यांना अचानक आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, अशी माहिती आमच्या सूत्रांकडून समजली आहे.