न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट अरबी समुद्रापर्यंत जाण्याची दुर्मिळ घटना यंदा प्रथमच घडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असल्याने राज्यात ऑगस्टमध्ये पडतो तसा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर १८ ऑक्टोबर रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरालादेखील परतीच्या पावसाने झोडपले आहे. बुधवारी दुपारपासून कोसळत असलेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत पडत होता. यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, निगडी, प्राधिकरण यासह अनेक भागात पाणी तुंबले होते.
काही ठिकाणच्या पाण्याचा निचरा झाला आहे. तर, काही भागातील पाणी अद्यापही साचले आहे. पाणी तुंबल्याच्या ४० ते ५० तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. अद्यापही अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. दरम्यान, म्हाळसाकांत चौक प्राधिकरण रोड येथे पावसाने झाड पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध झाड पडल्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे.