न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- महापालिकेत कार्यरत असलेल्या सहा सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. त्यात राज्य शासन प्रतिनियुक्तीवरील मंगेश चितळे, स्मिता झगडे आणि महापालिका सेवेतील आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर आणि संदीप खोत यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या नवीन आकृतिबंध, सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली आहे. नवीन आकृतिबंधानुसार सात उपायुक्तांच्या पदाची वाढ करत आणखी एक उपायुक्तपद मंजूर करून घेण्यात आले आहे. त्यात राज्य शासनाच्या सेवेतील चार आणि महापालिका सेवेतील चार अशा आठ उपायुक्तांचा समावेश आहे. तर, ११ सहायक आयुक्तांपैकी एक पद कमी करत दहा पदे निश्चित केली आहे. त्याची विभागणी राज्य सेवेतील पाच आणि महापालिका सेवेतील पाच अशी केली आहे.
महापालिका सेवेतील सुरक्षा विभागाच्या सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, ‘ अ ‘ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशासन विभागाचे मनोज लोणकर आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत यांना उपायुक्तपदी बढती दिली आहे. सहायक आयुक्तपदावरील सेवाज्येष्ठता क्रमानुसार उपायुक्तपदावरील या सर्वांची सेवाज्येष्ठता राहणार आहे. या बढत्यामुळे सहा सहायक आयुक्तपदे रिक्त झाली आहे. आता राज्य सेवेतील सुनील आलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी आणि महापालिका सेवेतील अण्णा बोदडे असे चार सहायक आयुक्त पदांवर कार्यरत आहेत.


















