न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील कामांमध्ये अनेक वेळा अनियमतता आढळून आलेली आहे. भ्रष्ट कारभारामुळे शहरातील अनेक उद्यानांची परिस्थिती दयनीय झालेली आहे. अनेक वेळा उद्यान विभागाच्या कामाची अनियमतता चव्हाट्यावर येऊन सुद्धा अद्याप पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कडक पावले उचलली नाहीत. गेल्या १० वर्षातील उद्यान विभागातील कामांमध्ये करोडो रुपये खर्च केले गेले. लाखो रुपयांच्या निविदा काढल्या गेल्या. परंतु, उद्यानांची अवस्था अनेक वर्षांपासून जैसे थेच दिसून येत आहे. ह्या १० वर्षाच्या कालावधीतील लेखाजोखा तपासणे जास्त महत्वाचे आहे. लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जातात परंतु ते काम अंतिम टप्प्यात असताना त्याची तपासणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. सर्वच ठिकाणी समांतर चोर मंडळी पालिकेच्या तिजोरीतील कररूपी पैशांची लूट करत आहेत, अश्या सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
जाहिरात क्रमांक १२५७, दिनांक ३/०५/२०१८, नुसार इ टेंडर निविदा मागविण्यात आल्या. त्याची अंतिम स्वीकृती तारीख ३१/०५/२०१८ होती. त्यामध्ये ९ क्रमांकावर मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध उद्यानांचे नूतनीकरण कामकाज करण्यासंदर्भातील निवदाही आहे. सदरचा कामाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. म्हणजेच नोव्हेबर २०१८ च्या अखेरीपर्यंत सदरचे काम पूर्ण करणे पालिकेला अपेक्षित ठरते. सदरची निविदा ३९,२९,५९५/- रुपयांची आहे. त्यामध्येच संत ज्ञानेश्वर उद्यानातील नक्षत्र वृक्ष वाटिकाचे काम समाविष्ट आहे. त्यामध्ये पोयटा माती पुरविणे व पसरविण्याचे काम अंतर्भूत आहे. सदरचे क्षेत्र ८३६६ चौरस मीटर आहे. माती ४ इंच पसरवणे अपेक्षित आहे. त्यानुसार एकूण मोजमाप ८३६ घनमीटर होते. एवढ्या मोजमापासाठी ३०४ ब्रास माती टाकणे आवश्यक आहे. म्हणजेच जवळ जवळ ७५ ट्रक माती. (एक ट्रक म्हणजेच ४ ब्रास).
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, अजय घाडी, बळीराम शेवते, अमित डांगे, विजय जगताप, मंगेश घाग, राम सुर्वे यांनी याबाबत शहानिशा केली असता धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये कोठेही पोयटा माती दिसूनच आली नाही. अधिक तपासणी केली असता फक्त १६ ट्रक काळी माती उद्यानामध्ये काही ठिकाणी पसरवल्याचे दिसून आले.
पोयटा मातीसाठी पालिका ट्रकमागे १०००० रुपये मोजत असते. ७५ ट्रक चा हिशोब केला असता ७.५ (साडे सात लाख) रुपये पालिका अश्या कामानां देत असते. परंतु, ३००० हजार रुपयांनी मिळत असलेली १६ ट्रक माती सदरच्या उद्यानाला पुरवलेली दिसून आली. म्हणजेच अंदाजे ४८००० हजार रुपये मातीसाठी खर्च केले केले आणि प्रतक्ष्यात बिल पास होणार साडे सात लाख रुपये. पहा ही तफावत.७.२ लाखाचा निव्वळ भ्रष्टाचार यामध्ये दिसून येत आहे. याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” जोपर्यंत उद्यानांच्या कामात आपण पारदर्शकता आणू शकणार नाही तोपर्यंत स्पेन, सिंगापूर किंवा दुबई च्या धर्तीवर “मिरॅकल गार्डन” पिंपरी चिंचवड सारख्या स्मार्ट आणि मेट्रो सिटी मध्ये अस्तित्वात येणार नाही.”












