- एका महिन्यात कामगारांची नोंदणी करणार – अप्पर कामगार आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- पुणे जिल्ह्यातील संघटीत-असंघटीत कामगारानी आज पुणे कामगार उपायुक्त कार्यालयावर धडक देत अंदोलन केले. जोरदार घोषणा देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
यावेळी जेष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, रिक्षा पंचायत सरचिटणीस नितिन पवार, केंद्रीय वेतन आयोग सदस्य चंदन कुमार, माधुरी जलमूलवार, वंदना थोरात , रज्जाक सय्यद, राजेश माने, अर्चना कांबळे, सुखदेव कांबळे, महादेव गायकवाड, सीमा शिंदे,सुनिता पोतदार,सायरा शेख,गौतम हातागळे,सखाराम केदार आदी उपस्थित होते. कष्टकरी संघर्ष महासंघ, राष्ट्रीय एकात्मता समिती, वर्किंग पिपल चार्टर यांचे तर्फे आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, कामगारांकडे राज्य शासनाने जाणीवेने पाहण्याची गरज असून या कोरोना महामारीमुळे श्रमिक वर्गाचे अनेक प्रश्न वाढलेले असताना ते सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
नखाते म्हणाले, बांधकाम कामगार, मजूर, स्थलांतरित कामगार यांच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. बांधकाम कामगारांचे नोंदणी ऑनलाईन करायचे का ऑफलाईन यामध्येच प्रशासन अडकले असून यांची नूतनीकरण आणि नोंदणी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले असून श्रमिक लाभापासून वंचित राहिलेले आहेत. कोरोना काळातील दोन हजार व तीन हजार अनुदान अनेक कामगाराना मिळालेले नाही. तसेच सध्या बंद करण्यात आलेली पाच हजाराची योजना ही पुन्हा सुरुवात करण्यात यावी. त्याचबरोबर बांधकाम कामगारांचे सर्व लाभ सुरु करावे.
नितीन पवार यांनी स्थलांतरित कामगारांचा मुद्दा उपस्थित करून त्यांची नोंदणी करणे बाबत प्रशासनाकडे आग्रह केला. चंदन कुमार यांनी केंद्र सरकार कामगार कायदे मोडीत काढत असुन केंद्र व राज्य सरकार यांच्या धोरणांमध्ये कामगार वंचित राहिलेले असून नोंदणी करण्याचा दिखावा न करता योग्य पद्धतीने करावी. नोंदणी इतर राज्यातील कामगारांची रितसर नोंद घ्यावी.
यावेळी शिष्ठमंडळाने अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, विकास पणवेलकर यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर कामगाराच्या मागण्यावर सकारात्मक विचार करु आणी कामगार नोंदणी एक महिन्यात सुरु करु, असे आश्वासन दिले.
















