त्यांच्या विरोधात थेट मंत्रालयातून तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाग्रस्ताला रुग्णालयात दाखल करण्यासाठी फोन करणाऱ्या नागरिकाला प्रतिसाद न देणे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना भोवले आहे. संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी थेट मंत्रालयात तक्रार केल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना पत्राद्वारे समज व सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना बाधित झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांच्या अडचणीचे निराकरण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी डॉ. पवन साळवे यांच्यावर देण्यात आली होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णाला दाखल करण्याबाबत डॉ. साळवे यांना फोन केला होता. पण त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बाबर यांनी साळवे यांची राज्य सरकारकडे मंत्रालयात तक्रार केली. त्यावर नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी दिलीप वाणिरे यांनी महापालिकेला पत्र पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मंत्रालयातून पत्र मिळाल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी डॉ. पवन साळवे यांना समज दिली. डॉ. साळवे यांनी याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करणे गरजेचे होते. योग्य मार्गदर्शन करून तक्रारीची सोडवणूक करणे अभिप्रेत होते. मात्र, त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे डॉ. साळवे यांनी भविष्यात नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी आदरपूर्वक संवाद साधावा. नागरिक, सदस्य व पदाधिकारी यांच्याशी सौजन्याने वागावे. नागरिकांचे प्रश्न कार्यक्षमपणे प्रथम प्राधान्याने सोडवावे. यामध्ये टाळाटाळ अथवा हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास शास्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.