- राष्ट्रवादीकडून एकही अर्ज नाही; विषय समिती सभापतीपदाची निवडणूक होणार बिनविरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी आज सोमवारी (दि. १९) दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्वीकृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात विधी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण चंदा लोखंडे, शहर सुधारणा सोनाली गव्हाणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक उत्तम केंदळे आणि शिक्षण समितीसाठी मनीषा पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक २३ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.
सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. विषय समित्यांमध्ये बलाबल कमी असल्याने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने शिक्षण समितीपदी मनीषा पवार यांना सलग दुसऱ्यावेळी तर स्वीनल म्हेत्रे आणि सोनाली गव्हाणे यांना पुन्हा एकदा सभापतीपद दिले आहे.
सभापतीपदासाठी महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.











