न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ६ डिसें) :- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमही घेण्यात आले.
शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घटनाक्रम सांगितला. मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थिती असताना डॉ. आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अर्थशास्त्रात पदवी मिळवून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. शिक्षिका विशाखा भगत यांनी सांगितले, की जगातील सर्वात मोठ्या लोकशाही संविधानाचे लेखन करून समाजातील तळागाळातील लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, शील, करुणा ही तत्वे दिली. मूलभूत अधिकार दिले. समाजातील अस्पृश्यता निवारणासाठी आंदोलने केली. डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेताना अभ्यासाचा ध्यास घेऊन जीवनातील ध्येय गाठले, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही विशाखा भगत यांनी केले.
यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे-पाटील, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, विशाखा भगत, भटू शिंदे आदींसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.












