न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसें) :- सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मागील काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी निविदेबाबत शंका उपस्थित करून, सदर कामाची फेर निविदा काढण्याबाबत विनंती आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये तथ्य दिसत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत २५५ कोटी रुपयांच्या फायबल केबल नेटवर्कींग प्रकल्पाच्या पहिल्याच निविदेमध्ये “रिंग’ झाल्याचा संशय आहे. हे काम एल अँण्ड टी कंपनीला देण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून दबाब येत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. सदर निविदा रद्दची मागणी पक्षाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही पूर्वीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. आता समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. या निविदेमध्ये प्री-बीड मिटींगला अनेक कंपन्या येवूनही त्या सहभागी का होऊ शकल्या नाहीत? त्यांच्या लेखी मागण्यांचा विचार का झाला नाही? निविदेला ४ वेळा मुदतवाढ का देण्यात आली? सदर कंपनीची निविदा सुमारे ८.३४ टक्के वाढीव असूनही तिलाच काम देण्याचा अट्टाहास का केला? असे प्रश्न कुरेशी यांनी उपस्थित केले आहेत. सुमारे २१ कोटी जादा दराने निविदा प्राप्त झाली, असा आरोप त्यांनी केला आहे.












