न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसें) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथे शिर्के बांधकाम साईटवर आज (दि. ९) रोजी अजब घटना घडली आहे. आजाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने विवाह ठरत नसल्याने एक धोकादायक पाऊल उचलले. आपल्याला विवाह करायचा आहे हे सांगण्यासाठी एक व्यक्ती चक्क उंचच्या उंच क्रेनवर चढला. त्याच्या या कृतीमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले.
दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित व्यक्तीला खाली आणण्यात त्यांना यश आले. तुझा विवाह लावून देतो अस म्हटल्यानंतर बराच वेळाने तो खाली आला आणि अखेर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र आपण आत्महत्या करण्यासाठी वर गेलोच नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
एचआयव्ही ची लागण झालेली ही व्यक्ती नाशिक येथून पिंपरी-चिंचवड येथे आल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. हा व्यक्ती मूळचा नांदेडमधील कंधार येथील आहे. मिळेल ते काम करून तो पोटाची भूक भागवतो. नाशिक येथे १५ दिवस काम केल्यानंतर मिळालेल्या पैशातून तो पिंपरी-चिंचवड शहरात आला. विवाह होत नसल्याचे तो निराशेत होता. वयाच्या २० व्या वर्षी त्याला एचआयव्ही ची लागण झाल्याने त्याचा विवाह होत नव्हता. कुटुंबातील व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत, यामुळे तो तणावाखाली होता. याच तणावातून तो रावेत येथील एका ५० ते ६० फुटांच्या क्रेनवर चढला. यावेळी तो उंचावरुन ‘माझा विवाह होत नाही, मी एचआयव्ही ग्रस्त आहे, मला विवाह करायचा असून, त्यासाठी मुलगी पाहा’ अस तो ओरडून सांगत होता. मोठी सुरक्षा असताना देखील तो क्रेनवर चढल्याने पोलीस हैराण झाले होते.












