- पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२०) :- शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये मद्य विकण्यास बंदी आहे. गावठी दारूसह विदेशी मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापे मारले. यात लाखो रुपयांचा देशी, विदेशी मद्याचा साठा आणि गावठी दारूचा साठा जप्त केला. दळवीनगर झोपडपट्टीतील मशिदीच्या मागील मोकळ्या जागेत गावठी दारूचा कॅन बाळगणाऱ्यास चिंचवड पोलिसांनी अटक केली. शंकर तिमाप्पा केचमल (वय ३८, रा. जयवंत विद्यालय, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर, वाकड पोलिसांनी दहा लिटर गावठी दारू बाळगल्याप्रकरणी सुनीता संजय रावळकर (वय ३७, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना विदेशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी बाबासाहेब सुभाष मांजरे (वय ३६, रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रहाटणी गावाच्या हद्दीतील स्वप्रसंकुल सोसायटीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी बाळू वसंत म्हसकर (वय ३०, रा. श्रीहरी कॉलनी, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी येथील इंदिरानगरमधील हॉटेल डबल ट्री मागे मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून तेथून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी माया राकेश भाट ( वय ३३, रा. इंदिरानगर, चिंचवड ) याच्या विरोधात पिपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पंधराशे रुपयांचे विदेशी मद्य ताब्यात घेतले आहे.