- सर्वसाधारण सभेत विषयास मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- शहरात सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामासाठी महापालिकेकडून १९४ चौरस फूट आणि वल्लभनगर येथील २१ हजार ४२५ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा महामेट्रोस ३० वर्षे भाडेतत्वावर दिली जाणार आहे. त्यासाठी एकूण २ कोटी ९ लाख ९६ हजार ७६३ रुपये भाडे अपेक्षित असून, ते महापालिकेच्या आर्थिक हिश्श्यातून वळते केले जाणार आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली.
दापोडीच्या हरिस पूल चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विविध ठिकाणच्या सुमारे सात जागा यापूर्वीच महापालिकेने मेट्रोच्या ताब्यात दिल्या आहेत. मेट्रोला विद्युत पुरवठा करण्यासाठी रोहित, आरएमयू संच ला बांधणीसाठी महामेट्रोच्यावतीने वल्लभनगर एसटी आगारासमोरील ४२५ चौरस फटांची जागा मागितली आहे.
तसेच, महापालिका भवनातील १९४ चौरस फूट जागा विद्युत डीपी बांधणीसाठी मेट्रोने पत्राद्वारे मागितली आहे. वल्लभनगरची जागा महापालिकेने मान्यतेवर २६ आक्टोबर २०१० रोजी महामेट्रोच्या ताब्यात दिली आहे. महापालिका भवन आवारातील जागेचा भाडेदर १ हजार ८७७ रुपये चौरस फूट आहे. त्यानुसार ३० वर्षांसाठी तीन लाख ६४ हजार १३८ रुपये भाडे होते.
वल्लभनगरच्या जागेचे भाडे दर १ हजार २६५ रुपये चौरस फूट आहे. त्याचे ३० वर्षांचे एकूण भाडे दोन कोटी ९६ लाख ३२ हजार ६२५ होते. या एकूण २३ हजार ६१९ चौरस जागेचे ३० वर्षांचे एकूण भाडे २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ होते. पुणे मेट्रो प्रकल्पात महापालिकेचा एकूण आर्थिक हिस्सा २८६ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. त्यापैकी जागेचा हिस्सा १८२ कोटी ६० लाख आहे. त्यानुसार वरील दोन्ही जागा महापालिका आर्थिक हिस्सापोटी देणार आहे. त्यास सर्वसाधारण सभेने विनाचर्चा मान्यता दिली.















