- पिं. चिं. महापालिकेत समावेशाची शक्यता आता धूसरच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहुगाव ग्रामपंचायतीचे अखेर नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. याची अधिसूचना पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी संस्थानचे विश्वस्थ माणिक मोरे, अजित मोरे, सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, माजी सरपंच मधुकर कंद, कांतिलाल काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला करंडे, देहूगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे आदी उपस्थित होते.
देहूगावची लोकसंख्या सुमारे तीस हजारपेक्षाही जास्त असल्याने पिंपरी चिंचवड पालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. याबाबत २०१२ पासून या मागणीने जोर धरला होता. तसेच ग्रामसभेत वेळोवेळी ठरावही मंजूर करून घेतले होते. या मागणीचा विचार करून २०१६ मध्ये तशी सूचनाही प्रसिद्ध केली होती. याचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर नगरपंचायत करण्यास मंजुरी मिळाली आहे.
या अधिसूचनेनुसार नगरपंचायतीच्या सीमा निश्चिती :-
पूर्वेस पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, तळवडे, पश्चिमेस मावळ हद्द, उर्वरित भाग खेड, इंदोरी, सांगुर्डी शीव, राजगुरुनगर (खेड), देहूरोड केन्टोंमेंट बोर्ड, खालूंब्रे, दक्षिणेस – निगडी, चिंचोली, देहूरोड कंन्टोमेंट बोर्डाची हद्द, उत्तरेस- खालुंब्रे, सागुडी (ता. खेड).















