- थेरगावातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- कोयत्याचा धाक दाखवून भंगार दुकानदारांकडुन ५०० रुपये घेतले. तसेच दर महिन्याला पाच हजार रुपयांचा हप्ता मागितला. दगडू पाटीलनगर, थेरगाव येथे बुधवार (दि. २) ते शनिवार (दि. ५) दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरिफ शेख (रा. थेरगाव), सागर जगताप (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मकसुद अब्दुल खान (वय २४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हातात कोयते घेऊन आरोपी हे फिर्यादी यांच्या भंगारच्या दुकानासमोर आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सहा भंगार दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये जबरदस्तीने हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर आरोपींनी दुकानदारांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची मागणी करून धमकी दिली.















