- अॅड. बाळासाहेब थोपटे यांची नोंदणी महानिरीक्षकांसह राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- भोसरीतील लांडेवाडी येथील सह दुय्यम निबंधक वर्ग २, हवेली क्रं. १४ हे कार्यालय गेल्या १८ नोव्हेंबर २०२० पासून बंद आहे. या कार्यालयाबाहेर ”काही अपरिहार्य कारणास्तव सह दुय्यम निबंधक वर्ग २ हवेली क्र. १४ या कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम बंद राहील. तरी पक्षकारांना होणा-या त्रासाबद्दल दिलगीर आहोत” असा मजकूर असलेली नोटीस लावलेली आहे.
नेमके हे कार्यालय किती दिवस बंद राहील? याचा कोणताही उल्लेख या नोटीशीत केलेला नाही. गेली अनेक दिवस कार्यालय बंद असल्यामुळे पक्षकारांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील इतर सह दुय्यम निबंधक वर्ग २ या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी वर्षअखेर असल्यामुळे मोठी गर्दी होत आहे.
त्यामुळे नोंदणी महानिरीक्षकांनी लांडेवाडीतील सह दुय्यम निंबधक वर्ग २ चे कार्यालय त्वरीत सुरु करावे, अशी मागणी अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, सह. जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















