- माइक, ग्लाससह प्लेटांची तोडफोड; नगरसचिवांनाही धक्काबुक्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची नियोजित सभा अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेला सुरुवात होताच वाकडच्या कामांना राज्य शासनाने मान्यता दिलीच कशी? असा प्रश्न चिंचवड आमदारांच्या समर्थकांनी उपस्थित करत खुलाशाची मागणी केली.
यावर पुढील आठवड्यात होणाऱ्या सभेत खुलासा करू, असे उत्तर आयुक्तांनी दिले. मात्र त्यावरुन समाधान न झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चार सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही सदस्यांनी माइक, ग्लाससह प्लेटांची तोडफोड केल्याने सर्वजणच अवाक झाले. यानंतर काही सदस्यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्याचे लक्षात येताच काही सदस्यांनी गोंधळ आवरता घेतला तर स्थायीच्या अध्यक्षांनीही सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.
स्थायी समितीच्या सभेत राडा घालणाऱ्या सदस्यांनी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र यु टर्न घेतला. सभेदरम्यान सभापती संतोष लोंढे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांच्याशी वादच झाला नसल्याचे सांगितले. आम्ही बोगस एफडीआर बद्दल खुलासा मागत होतो. आयुक्त खुलासा करत नसल्यामुळे गोंधळ झाल्याचे या सदस्यांनी सांगितले. मात्र, स्थायी अध्यक्ष यांनी सभागृहात काही मुद्द्यांवर वाद झाला ही वस्तुस्थिती असून काहीजणांचे गैरसमज झाले असतील ते दूर केले जातील व आजची बाब पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे, असल्याचे लोंढे यांनी सांगितले.


















