- रेडझोनमधील बांधकामांचा देखील समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी महापालिकेकडून एक पथक नियुक्त करण्यात येत आहे. हे पथक अनधिकृत बांधकामाची पाहणी करून संबंधितांवर मालकावर गुन्हा दाखल करीत आहे. मंगळवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दोन, भोसरी ठाण्यात तीन आणि दिघी ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज पांडुरंग नवगिरे (रा. खडी मशीन रोड, मोशी), सुनील बबन कुदळे (रा. खडी मशीन रोड, मोशी) या दोघांच्याविरोधात एमआयडीसी भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल बाबूराव शिंदे (वय ५१), विजय चुनीलाल शहा (३५, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी), अजय मुरलीधर पिसाळ (रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) या तिघांच्या विरोधात भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी आणि भोसरी ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींनी विनापरवाना बांधकाम केले. त्याबाबत पालिकेने त्यांना नोटीस बजावली. मात्र आरोपींनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्याने त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वायकर त्रिंबक (रा. वडमुखवाडी), मुकेश तुकाराम देवकर (रा. वडमुखवाडी) आणि दोन महिलांच्या विरोधात दिघी ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांची जागा रेडझोनमध्ये आहे. असे असतानाही त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम केले. बेकायदा बांधकामाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.