- तीस लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांकडून जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- आयटीनगरी म्हणून नावलौकिक असलेल्या हिंजवडीत सुरू असलेल्या गुटखा रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल तीस लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि. ९) दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई केली. परशुराम चौधरी मेघवाल, ललित गोविंदराम खारोल अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे कर्मचारी शहरात गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की, हिंजवडी व परिसरात गुटख्याचे मोठे रकेट सुरू असून एका गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. पोलिस आल्याचे समजताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक टेम्पो व कार जप्त केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कारभाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलिसांचा खुलासा घेणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


















