न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- निगडी येथील श्री. खंडोबा मंदिरामध्ये मार्गशीष शुद्ध अर्थात चंपाषष्ठी षडरात्रीला प्रारंभ झाला असून, शनिवार (दि. ८) रोजी सकाळी मंदिरामध्ये संतोष काळभोर यांच्या हस्ते घट बसविण्यात आला आहे. रोज सकाळी १० वाजता सहा दिवस आरती होणार आहे.
गुरुवार (दि. १३) रोजी पहाटे ५ वाजता शंकर पिंड व खंडोबाच्या मूर्तीला दहिदुधाने स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर श्री. खंडोबाच्या मूर्तीला पोशाख चढविण्यात येणार आहे. संध्याकाळी ४ ते ७ या वेळेमध्ये ओम श्रीनाथ मल्हार (थेरगाव) यांचा मंदिरामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महाआरती झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. या दिवशी ४ ते ५ हजार भाविक दर्शनासाठी येत असतात, असे निगडी येथील श्री. खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर व उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर यांनी सांगितले आहे.












