- बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांचे राज्य कामगार मंत्र्यांना साकडे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- राज्याच्या दुष्काळी भागातील बांधकाम कामगार पोटासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर करीत असतात. कामाची व्यवस्था झाली तरी त्यांची राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे बरेच कामगार उपाशीपोटी किंवा अर्धपोटी अतिशय कष्टाची जड व अवघड कामे करत असतात.
दिवसरात्र काम करणाऱ्या या कामगारांना किमान दुपारच्या वेळेस जेवणाची व्यवस्था करण्याबाबत बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार आयुक्तांकडे मागणी करत सक्षम पाठपुरावा केला होता.
कल्याणकारी मंडळाने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्याची घोषणा केली. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक शहरातील कामगार नाके, सर्व शासकीय व निमशासकीय बांधकाम प्रकल्पावरील कामगारांना दुपारी मध्यान्ह भोजन योजना लवकरात लवकर सुरू करावी. त्यामुळे कित्येक गरजू व भुकेल्या कामगारांच्या पोटाला आधार मिळेल. या कामासाठी शहरातील महिला बांधकाम कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक प्रगतीतही भर पडेल. या स्वरूपाची मागणी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी राज्य कामगार मंत्र्यांकडे केली आहे.












