- नव्या प्रस्तावानुसार क्रमांकाचा रेट वधारला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- चारचाकीसाठी दहा हजारांपासून तब्बल पाच लाखांपर्यंत, तर दुचाकीसाठी पाच हजारांपासून जास्तीत जास्त एक लाखांपर्यंतची शुल्क अकारणी केली जाणार आहे. राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत.
वाहनांची नवी मालिका जाहीर झाल्यापासून आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मोठी मागणी येत असते. पूर्वी त्यासाठी कार्यालयात गर्दी होत असल्याने चारचाकी किंवा दुचाकीची नवी मालिका जाहीर होण्यापूर्वी आकर्षक क्रमांकांसाठी संबंधितांकडून अर्ज मागविले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक वाहनधारकांची मागणी असल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येतो. ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम देणाऱ्यांना संबंधित क्रमांक दिला जातो. आकर्षक क्रमांकातून राज्यभरात कोटय़वधी रुपयांचा महसूल शासनाला मिळतो.
सर्वाधिक मागणी असलेला ०००१ हा क्रमांक दुचाकीसाठी सध्या ५० हजार रुपयांना, तर चारचाकीसाठी चार लाख रुपयांचे शुल्क भरून मिळतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार हा क्रमांक अनुक्रमे १ लाख आणि ५ लाखांना करण्यात येणार आहे. नव्या प्रस्तावाबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यांचा विचार करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.















