- पिं. चिं. वाहतूक शाखेकडून व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- वाहतुकीच्या विविध समस्या आणि वाहतूक कोंडीच्या तक्रारीची आता थेट वाहतूक शाखेत तक्रार करणे सोपे झाले आहे. वाहतूक शाखेकडून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रारी घेण्यात येत आहेत. फोटो आणि ठिकाणांसह पाठवलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात जवळपास १८ हून अधिक तक्रारींचे निरसण करण्यात आले आहे.
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयांतर्गत दहा वाहतूक शाखा कार्यरत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, हिंजवडी, सांगवी, तळवडे यासह ग्रामीण भागातील देहूरोड – तळेगाव, दिघी – आळंदी या वाहतूक पोलिस शाखांचाही समावेश आहे. वाहतूक शाखेच्या वतीने ९५२९६८१०७८ हा व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
सात डिसेंबरला या व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत जवळपास १८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक हिंजवडी, पिंपरी आणि सांगवी येथील आहे. तर , ग्रामीण भागालगत आळंदी येथील तक्रार आली आहे. यात रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्क करणे, वाहतूक कोंडी यासह वाहतुकीला अडचण होण्याच्या तक्रारी आल्या. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीचे निरसण करण्यात येत आहे. तशा सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्रीकांत डिसले, सहायक पोलिस आयुक्त यांनी दिली.














