- “सनबर्न फेस्टिव्हल” रद्द करण्याची अपना वतन संघटनेची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ डिसें.) :- तरुणाईला उध्वस्त करणारा समाजविघातक “सनबर्न फेस्टिव्हल” रद्द रद्द करावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधीकारी, पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पुणे शहरातील बावधन या ठिकाणी शनिवार दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी “सनबर्न फेस्टिव्हल” या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सनबर्न फेस्टिव्हलला अनेकवेळा विरोध करूनही, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनकडून जनतेच्या रोषाच्या विरोधात जाऊन परवानगी दिली जाते. या धोरणाचा अपना वतन संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
भारत देशातील सर्व धर्म संस्कृतीचे तसेच महापुरुषांच्या विचाराचे संवर्धन व संगोपन व करायचे सोडून देशातील तरुणाईला उध्वस्त करणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीच्या अश्लील, बेधुंद, अमली पदार्थांच्या नशायुक्त कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. हे आपल्या भारत देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये चरस, अफू, गांजा, कोकेन यांसारखे अनेक अमली पदार्थ उपलब्ध करून दिली जातात. हे उपलब्ध करून देणारे सगळे दलाल हे बहुधा परप्रांतीय अथवा विदेशी नागरिक असल्याचे दिसते.
दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक अशा वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले हे हस्तक येथे अमली पदार्थ तस्करी करीत असल्याचे दिसते. विदेशी मंडळीही यात मागे नाही. नेपाळी, नायजेरियन, इस्रायली, जपानी, पॅलेस्टिनी अशी वेगवेगळ्या वंशाची विदेशी मंडळी देशाच्या युवा पिढीला बरबाद करण्यासाठी सक्रिय आहे. यामुळे अमलीपदार्थी विरोधी कायद्याचे उल्लंघन होते.
गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबडकर जयंती यांसारख्या पारंपरिक उत्सवांना न्यायालायच्या आदेशाप्रमाणे नियम व अटी घालून दिल्या जातात. परंतु, सनबर्न फेस्टिवलमध्ये ध्वनी प्रदूषणच्या कसलीही अटींचे बंधन नाही. तसेच वेळेची मर्यादा नाही. तीन दिवस महाभयंकर डीजेच्या आवाजात व्यसनाधीन तरुणाचा नंगानाच चालू असतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक कायद्याचे मोठ्या प्रमाणवर उल्लंघन होते.
सनबर्न फेस्टिव्हलच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे लोंढे या परिसरात येतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह त्या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. स्थानिक भागामधील पाणीपुररवठा, वीजपुरवठा या गोष्टींवर परिणाम होऊन स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होता. जनतेचे एवढे हाल करून काही ठराविक लोकांच्या आर्थिक हितसंबंधासाठी हा फेस्टिवल करणे योग्य नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे या शहराला एक सामाजिक वारसा आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ भागातून एक-एक मावळ्याला जमा करून स्वराज्याची लढाई लढली. जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या देहू, आळंदी सारखा पवित्र परिसर, हजारो जणांना जगामध्ये नावलौकिक प्राप्त करून देणारे पुणे विद्यापीठ, महात्मा फुले यांच्या माध्यमातून सुरु झालेलं शिक्षणाची चळवळ, प्रसिद्ध असलेला पुण्यातील गणेशोत्सव, शिक्षणाचे माहेरघर असलेलं सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर, अशा समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हलमुळे वारंवार बदनाम होत आहे.
हजारो तरुणाचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या या सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारून हा नियोजित कार्यक्रम रद्द करावा. त्याची माहिती संघटनेला २० डिसें २०१८ पर्यंत कळवावी. अन्यथा समस्त संघटनांच्या व पुणेकरांच्या वतीने हा कार्यक्रम उधळला जाईल, त्यावेळेस काही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास, त्यास राज्य सरकार व जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, याची नोंद घ्यावी.












