- आरोपींकडून परिसरात दहशत; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२०) :- फिर्यादी भरत हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी एका स्विफ्ट कार (एम एच १४/४०३४) मधून आले. त्यावेळी फिर्यादी बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. आरोपी तिथे आले आणि फिर्यादी व त्यांचा मित्र रफिक यांना म्हणाले ‘ तुम्हाला ठोकतो. गोळ्या घालतो त्यानंतर आरोपी प्रशांत कोळी आणि सुरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.
आरोपींनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घेतले असल्याचे भरत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ही घटना रविवारी (दि. २०) रात्री पावणे बारा वाजता सेक्टर क्रमांक २२, निगडी येथील बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर घडली.
याबाबत भरत ज्ञानोबा थोरात (वय २८, रा सेक्टर क्रमांक २२, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत रमेश कोळी (वय ३२), सुरज पवार (वय २८), राहुल सोनकांबळे (वय २८, रा. सेक्टर क्रमांक २२, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















