- शहरातील उद्योजक संघटनांची सरकारकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची सुधारीत आवृत्ती समोर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्योगांचे रात्रपाळीचे काम विस्कळीत होणार आहे. त्यासाठी औद्योगिक संघटना संचार बंदीच्या विरोधात आहेत. त्यातून उद्योगांना वगळण्याची मागणी होत आहे. अन्यथा बंदी झुगारून आम्ही काम करू, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
पहिल्या टाळेबंदीचे परिणाम अजूनही उद्योग सोसत आहेत. बहुतांश उद्योगांचा गाडा हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, अजूनही कोविडपूर्व स्थिती गाठण्यात अनेक उद्योगांना यश आले नाही. रात्रीच्या संचारबंदीचा उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उद्योगांबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. अनेक उद्योग रात्रीदेखील सुरू असतात. तसेच, अनेक उद्योगांच्या कच्च्या मालाची आणि तयार मालाची वाहतूक रात्रीच्या वेळेत होते. संचारबंदीच्या निर्णयामुळे उद्योगांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे. नुकसानीची तीव्रता वाढणार आहे. म्हणून सरकारने उद्योगांना संचारबंदीतून वगळले पाहिजे, असे मत उद्योजक व्यक्त करू लागले आहेत.














