- दररोज लोकेशनसह फोटो पाठवून द्यावी लागणार ऑनलाइन हजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यानंतरही काही गुन्हेगार शहरात येऊन पुन्हा गुन्हेगारी कृत्य करतात. याला आळा घालण्यासाठी तडीपार गुन्हेगारांनी दररोज लोकेशनसह फोटो पाठवून त्यांनी ऑनलाइन हजेरी द्यावी, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.
सराईत गुन्हेगारांना संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले जाते. तडीपार गुन्हेगाराला तो राहणार असलेल्या जिल्ह्यात पोलीस त्याला सोडून येतात. तसेच जिल्ह्यातील त्याच्या वास्तव्याचे ठिकाण असलेल्या भागातील संबंधित पोलीस ठाण्यात त्याची नोंद केली जाते. तडीपारीच्या कालावधीत मूळ शहर किंवा जिल्ह्यात यायचे असल्यास त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.
मात्र, परवानगी न घेता काही गुन्हेगार शहरात येतात. तसेच यातील काही गुन्हेगार शहरात वास्तव्यही करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील करतात. तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस त्याची दररोज ऑनलाइन हजेरी घेणार आहेत. संबंधित गुन्हेगार असलेल्या ठिकाणाचे लोकेशन तसेच फोटो त्याने दररोज पोलिसांना पाठविणे बंधनकारक आहे. लोकेशनसह फोटो न पाठविल्यास त्या दिवशी स्थानिक पोलीस त्याचा शोध घेतील.












