सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- ‘आम्ही स्नॅपडील मधून बोलत आहोत. तुम्हाला एसयूव्ही कार बक्षीस मिळाली आहे ‘ असे सांगून नोकरदाराला गंडा घालण्यात आला आहे. अनिलकुमार शीतलप्रसाद तिवारी (वय ५१, रा. पिंपळे गुरव) अशी फसवणूक झालेल्या नोकरदार व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी दयाशंकर जगदंबा प्रसाद मिश्रा आणि यंकप्पा अशा तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२० कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी तिवारी यांना फोन करून आम्ही स्नॅपडीलमधून बोलत आहोत. तुम्ही आमच्या कंपनीचा ऑक्सीमीटर घेतला आहे. तुम्हाला महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० कार बक्षीस मिळाली आहे, असे सांगितले.
आरोपींनी तिवारी यांच्याकडून तब्बल २० लाख ३५० रुपये घेतले. तिवारी यांच्याकडून पैसे घेऊन आरोपींनी त्यांना कार दिली नाही. तसेच त्यांची घेतलेली रकम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.