न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट रोजी झाली आहे. स्थापनेपासूनच चिंचवड येथील आयुक्तालयाच्या इमारतीचे रेंगाळलेले काम, अपुरी व नादुरुस्त वाहने, आयुक्तालयाच्या इमारतीचे संथ गतीने सुरु असणारे काम आणि तुटपुंजे मनुष्यबळ याबाबत महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात मंगळवार (दि. ११) रोजी महाराष्ट्र राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे प्रमुख अतिरिक्त महासंलाचक परबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मनुष्यबळ व गाड्या यांच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात असंख्य त्रुटी असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश मुंबई पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. यावेळी नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त महासंचालक धनंजय कमलाकर, आस्थापना विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पुणे शहर सहआयुक्त शिवाजी बोडखे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. ज्या प्रस्तावावरून मनुष्यबळ, वाहने दिली गेली. त्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर आणि नव्याने जोडल्या गेलेल्या ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस ठाण्यांच्या भागासाठी आवश्यक मनुष्यबळ व वाहनांच्या गरजेनुसार नवा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.












