पिंपरी (दि. १३ डिसें.) :- माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली असून, त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ऐन हिवाळ्यातच पाण्याची बोंब झाली असून, सत्ताधाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नगरसेवकांच्या आश्रयाने बांधकामांना रोजरोसपणे पाणी पुरवठा केला जात आहे. ही बांधकामे मी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहेत. मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. व्यावसायिक बांधकामास खासगी प्लंबरमार्फत दीड इंची अनधिकृत नळजोड रात्रीच्या वेळेस दिला जातो. उलट जे वेळेवर पाणीपट्टी भरतात त्या सोसायटींना अधिकृत नळजोड असूनही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने पाणी टॅंकर विकत घ्यावा लागत आहे.
यासाठी नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करत अनधिकृत नळजोडवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आयुक्त कार्यालयाबाहेर नागरिक हंडा मोर्चा काढतील, असा इशारा राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.












