- संघटनेचा विरोध झुगारून आयुक्तांकडून कामाची वर्क ऑर्डर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने सेवेतील व निवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या आधीची धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात आली आहे. या कामाची वर्क ऑर्डर सोमवारी (दि. ४) देण्यात आली.
या योजनेवर पहिल्या वर्षी २७ कोटी खर्च करण्यात येणार असून, प्रत्यक्ष लाभ आठवड्याभरापासून मिळणार आहे. कर्मचारी महासंघाचा विरोध डावलून आयुक्त श्रावण हडीकर यांनी ही योजना कार्यान्वित केली आहे.
धन्वंतरी योजनेप्रमाणे अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरमहा ३०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. तर, निवृत्त कर्मचाऱ्यांना १५० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. या योजनेत अधिकारी व कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांना वर्षभरात ३ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत.