- रहिवाशाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- चिंचवड परिसरातील सुदर्शननगर भागातील रहिवासी शिवाजी कृष्णाजी भोंडवे यांचा विवेक बंगल्यात सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती गॅस शेगडी लायटरने पेटविताना गॅसची अचानक गळती होवून पेट घेतला.
भोंडवे यांनी पेटता गॅस सिलेंडर तारेची आकडी करून बाहेर आणला. बंगल्याच्या आवारातच त्याची एम.एच.१४ एक्स २५१६ मारुती गाडी उभी होती. गॅस सिलेंडरने गाडीचा मागील भाग देखील जळून खाक झाला. न घाबरता त्यांनी पाणी व वाळूचा मारा सुरु ठेवला होता. रस्त्यासमोरील भागातून पिंपरी चिंचवड स्कूल बस चालक-मालक संघटनेचे बाबासाहेब भालदार यांनी त्वरित संत तुकाराम नगर येथील अग्निशामक दलाला दुरध्वनी करून प्रसंगवधान ओळखून संपर्क साधला.
पुढील काही मिनिटांतच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने पाण्याच्या जोरदार फवार्याने ज्वलनशील गॅस सिलेंडर विझवून मोठी दुर्घटनेपासून घडणार्या घटनेचा बचाव केला. यावेळी अग्निशामक जवानांनी तातडीने कळविल्याबद्दल बाबासाहेब भालदार यांचे विशेष आभार मानले.
अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सोरटे, शिवला झनकर, दत्ता रोकडे, विकास बोंगाळे, शाम इंगवले, पंकज येडके या जवानांनी आगीवर नियंत्रण करून मोठी कामगिरी पार पाडली. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, बासू गुत्ती, शशांक देशपांडे आदींनी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे आभार मानून शिवाजी भोंडवे यांचे दाखविलेल्या प्रसंवधानाचे विशेष कौतुक केले.
चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की, आग कोठेही दिसून आली की, (०२०-२७४२३३३३) या क्रमांकावर दुरध्वनी करून सजग नागरिक होण्याच्या नात्याने आपले कर्तव्य पार पाडावे. नागरिकांनी बघ्याची भूमिका घेवू नये. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आपल्या मोबाईलमध्ये अग्निशामक दल तसेच इतर तातडीची सेवा देणार्या दुरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक जतन करून होणारी घटनेचे कमीतकमी नुकसान कसे होईल, याबाबत जागरुक रहावे. पिंपरी चिंचवड मनपाने देखील शहराच्या विविध भागात मुख्य गर्दी व चौकाच्या ठिकाणी असे विविध घटनेपासून बचाव करण्यासाठी अस्तित्वात असलेले दुरध्वनी, मोबाईल, संबंधित अधिकारी यांचे समावेश असलेले फ्लेक्स लावून नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केली आहे.