- अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जा..
- माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार ‘क्युऑस’ मशीन गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बंद आहे. नादुरुस्त मशीन चालू करण्याची मागणी सातत्याने करूनही ‘क्युऑस’ मशीन दुरुस्त होत नाही. मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना फेरफार काढण्यासाठी पुणे कार्यालयात जावे लागते. त्यात नागरिकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून मशीन दुरुस्त करून घ्यावी. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
याबाबत त्यांनी आकुर्डी तहसील कार्यालयात तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच कार्यवाहीसाठी या निवेदनाची प्रत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास देखील पाठविली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयात ३० महसुली गावातील सन १९३० ते २०१० या कालावधीतील स्कॅनिंग केलेले सातबारा उतारे व फेरफार उतारे शेतक-यांना सत्यप्रति देण्यासाठी ‘क्युऑस’ मशीनद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याद्वारे शेतक-यांना सातबारा, फेरफार नकला देण्यात येत होत्या. सध्या मशीन बंद असल्यामुळे नागरिक अभिलेख कक्षात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करीत आहेत.
या अर्जाची निर्गत होण्यासाठी पारंपारिक पद्धतीने अभिलेखाचा शोध घेणे. त्याची फी आकारणी करणे, नागरिकांच्या तक्रारीचे निरासन करणे. आदींमुळे कामाला मोठा विलंब होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरी भाग असल्याने नागरिकांना कोर्टाच्या कामासाठी, अपील केससाठी नक्कल लागत आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नादुरुस्त मशीन लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे, असे या निवेदनात माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी म्हटले आहे.