- ती निविदाच रद्द करण्याची कारभाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२१) :- महापालिकेतील सुरक्षा विभागाच्या वतीने सुरक्षारक्षक व ट्रफीक वॉर्डनसाठी निविदा काढण्यात आली आहे. २० कोटींच्या निविदेत सत्ताधाऱ्यांनी घोळ केल्याचा आरोप होत असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महापालिका आयुक्तांना निविदा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या कारभाऱ्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत सुरक्षारक्षक आणि ट्रॅफीक वॉर्डन नियुक्त करण्यासाठी १३ ऑगस्टमध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. कोविडमुळे ही प्रक्रिया लांबली होती. पिंपरी – चिंचवड शहरातील निगडी ते दापोडी, कासारवाडी ते मोशी, काळेवाडी ते नाशिकफाटा, औंध ते रावेत, वाकड ते कासारवाडी या बीआरटी मार्गावर सुरक्षारक्षक आणि ट्रॉफीक वॉर्डनची नियुक्ती केली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारावर राज्यातील नेत्यांनी आक्षेप घेतल्याचे उघड झाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महापालिका आयुक्तांना निविदा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवीण दरेकर म्हणाले, ” सुरक्षा विभागाच्या वतीने सुरक्षारक्षक व ट्रॅफीक वॉर्डनसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेत ठराविक ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेऊन नियम व अटी घातल्या आहेत. त्यामुळे निविदा धारकांच्या तक्रारी लक्षात घेता सुरक्षा विभागामार्फत प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करावी.