- न्यायालयासाठी नाममात्र दरात इमारत देण्यास स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२१) :- नेहरूनगर येथील इमारत पिंपरी न्यायालयासाठी नाममात्र दरात देण्याबाबत स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे न्यायालय स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यापासून यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
मोरवाडी येथील न्यायालयाची जागा सध्या अपुरी पडत आहे. मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वेळोवेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार नेहरुनगर येथील जागेत स्थलांतर करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेने या इमारतीसाठी तब्बल १३ लाखाचे भाडे मागितले. त्यास राज्य सरकारकडून निर्बंध आल्याने हे स्थलांतर अडकले होते.
याबाबत स्थायी समितीकडे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या सभेत ऐनवेळी हा विषय घेण्यात आला. त्यानंतर नेहरूनगर येथील सर्व्हे क्रमांक १०९/११० येथील इमारतीस नाममात्र दरास देण्यास मंजुरी देण्यात आली. पिंपरी महापालिकेकडे बार असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष दिनकर बारणे, अतिष लांडगे, माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, अतुल अडसरे, हर्षद नढे, सुजाता बिडकर, पूनम राउत, विश्वेश्वर काळजे, हरीश भोसुरे यांनी पाठपुरावा केला.