- वाकड मैलाशुद्धीकरणचे सांडपाणी थेट मुळा नदीत…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वाकड येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया न करता थेट मुळा नदीत सांडपाणी सोडले जात आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी – चिंचवड महापालिकेस नोटीस बजावली आहे. तत्काळ जलप्रदूषण रोखून अत्यावश्यक उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
वाकड गावठाण स्मशानभूमीजवळील जलनिस्सारण विभागाच्या ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैला शुद्धीकरण केंद्रापर्यंत कोणतेही ड्रेनेज वाहिनी टाकण्यात आलेली नाही. वाकड परिसरातील सांडपाणी प्रक्रियाविना सोडल्यामुळे मुळा नदीपात्रातील जीवसृष्टी आणि – नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. तसेच, वीज पुरवठा खंडित झाल्यास केंद्रात जनरेटरची सुविधा नसल्याचे दिसून आले. या संदर्भात तातडीने उपाययोजना करून थेट नदी पात्रात सांडपाणी सोडणे थांबवा, असे सक्त निर्देश मंडळाने पालिकेने दिले आहे. याबाबत खुलासा करण्याचे निर्देशही पालिकेस देण्यात आले आहेत.