- यंदा मिळकतकरात वाढ न करण्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात वाढ न करण्याचा निर्णय घेत महापालिकेने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी २० फेब्रुवारी २०२० पूर्वी करांचे दर ठरविणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने २०२०-२१ नुसार दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांना पूर्वीच्या दरानेच कर भरावा लागणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरवाढ करून त्यांच्यावर भार न टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वर्षभरावर महापालिका निवडणुका असल्याने मतदारांची नाराजी ओढवून घेणे महागाचे ठरू शकते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दरवाढीला मंजुरी मिळाली नसती. सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचा तसा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. १९) होणाऱ्या स्थायी समितीसमोर आहे. कर संकलन विभागाच्या प्रस्तावात जुन्याच दरांना मंजुरी मिळावी असे नमूद केले आहे.


















