- सौम्य स्वरुपात ताप येणे ही एकप्रकारे सकारात्मक रिअॅक्शन..
- लसीकरण अधिकाऱ्यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- देशभरात शनिवारी उत्साहात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर रविवारी राज्यात लस घेतलेल्या सुमारे २५० जणांना थंडी, ताप व उलट्यांचा त्रास झाला. पुणे जिल्ह्यात एकालाही लसीचा त्रास झाला नाही.
विदर्भासह जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, कराड येथे काहींना थंडी, ताप आला. त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. थंडी, तापाची सौम्य लक्षणे असून कोणालाही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नागपूर विभागात १६६, तर विदर्भात २०१ लोकांना किरकोळ रिअॅक्शन आली. जळगाव, औरंगाबादला कोविशिल्ड लस घेतलेल्या ५१ जणांना थंडी, तापाची सौम्य लक्षणे आढळल्याचे जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. वैजापूर येथे दोघांना लस घेतलेल्या जागेवर खाज येत होती. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, कराड (जि. सातारा) येथे पाच आरोग्य सेवकांना त्रास जाणवू लागला. बीड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून काहींना ताप, अंगदुखी, डोकेदुखीजाणवल्याचे समोर आले.
कोणत्याही लसीकरणानंतर रिअक्श्न येत असते. सौम्य स्वरुपात ताप येणे ही एकप्रकारे सकारात्मक रिअॅक्शन असते. लसीकरणानंतर शरीरात प्रतिसाद सुरु झाला, हे त्यातून दिसून येते. गंभीर रिअॅक्शन ही लसीकरणानंतर अर्ध्या तासातच येत असते, अशी माहिती औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी दिली.


















