- महिनाभरापूर्वीच नवीन अध्यक्षांची नियुक्ती; मात्र, कार्यालयात फिरकलेच नाहीत..
- राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे चिंचवड माथाडी बोर्ड अडगळीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. जानेवारी २०२१) :- मोठा गाजावाजा करून राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर सदस्यपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्याची अंमलबजावणी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात झाली. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांच्या नेमणुका झाल्या. मात्र, उद्योगनगरीचे बिरूद मिरविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड माथाडी मंडळाकडून राज्याच्या उपसचिवाच्या आदेशाला सोयीस्करपणे केराची टोपली दाखविली जात आहे.
गेल्या तीन महिन्यापासून माथाडी मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्त सदस्यांचे साधे अभिनंदन करण्याचे औदार्यही या मंडळाने दाखविलेले नाही. कामगारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असणारे पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळ आपल्या बेजाबदार वर्तनातून रामभरोसे कारभार करीत आहे. कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या या मंडळाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघत असल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू पाहत आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे मुख्यत्वे औद्योगिक शहर म्हणून विकसीत झालेले आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयांतर्गत चिंचवड येथे माथाडी बोर्ड कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळाच्या अधिपत्याखाली पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, खेड या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांचा समावेश होतो. या माथाडी बोर्डात बहुतांश कामगार नोंदणीकृत आहेत. माथाडी मंडळात काम करताना या कामगारांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळावर सदस्याची नेमणूक न झाल्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मंडळाकडे पडून आहेत.
राज्याच्या कामगार मंत्रालयाने पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांच्या नुकत्याच नेमणुका जाहीर केल्या आहेत. तसे पत्रही राज्य शासनाकडून देण्यात आले. मात्र, चिंचवड माथाडी बोर्डाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. बोर्डाच्या सध्याच्या सल्लागार समितीच्या संचालकांकडून जबाबदारी झटकण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड व पुणे माथाडी मंडळ स्थापन होऊन ३ महिने झाले तरी, पिंपरी चिंचवड माथाडी मंडळांतर्गत येणा-या माथाडी कामगारांच्या प्रश्नावर एक साधी नवनियुक्त सदस्यांची बैठक देखील अध्यक्ष या नात्याने आयोजित करण्यात आली नाही, ही खुप मोठी शोकांतिका आहे. उलटपक्षी पुणे माथाडी मंडळाकडून नवनियुक्त सदस्यांच्या ३ बैठका पार पडल्या. या सर्व बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावरून पिंपरी चिंचवड माथाडी मंडळातील कामगारांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त सदस्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भमिका कामगार आयुक्तांना घ्यायची की नाही? चिंचवड माथाडी बोर्डाकडून याचे उत्तर अपेक्षित आहे, अशी मागणी कामगार करीत आहेत.
पिंपरी चिंचवड एमआयडीसीसह संपूर्ण ७ तालुक्यांची जबाबदारी असलेल्या या विभागातील अधिकाऱ्यांच्या दिशाहीन कारभारामुळे त्याचा विपरीत परिणाम कामगारांच्या भविष्यावर पडत आहे. माथाडी कामगारांसाठी शासनाने माथाडी मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना आखल्या, पण प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक माथाडी कष्टकरी योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्रीच आहेत. सर्वात जास्त माथाडी कामगारांची नोंदणी व जास्त भरणा जमा केला जात असुनसुद्धा पिंपरी चिंचवड माथाडी मंडळातील नोंदीत कामगार हा उपेक्षित दिसुन येतो. पुणे शहरापेक्षा जास्त भरणा शहरातील कामगारांकडून पिंपरी चिंचवड माथाडी मंडळात जमा होतो. पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांना ३० टक्के लेव्ही तर, पुणे जिल्ह्यातील कामगारांना ३५ टक्के लेव्ही देण्यात येते असा फरक का? असा प्रश्न सुद्धा येथील नोंदीत माथाडी कामगारांना पडला आहे.
बोर्डाकडून औद्योगिक क्षेत्रातील या कंपन्यातील नोंदणीकृत माथाडी कामगार यांच्या वेतन, लेव्ही, पगारवाढ तसेच इतरही समस्या या महामंडळाच्या वतीने सोडवण्यात येतात. कामगार व कारखानदारांमध्ये समन्वय साधणे, औद्योगिक शांतता कायम करणे तसेच विविध कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा विभाग महत्त्वाचा असा आहे. कामगारांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने व अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने कामगार संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. राज्य शासनाने पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाच्या कारभारामध्ये लक्ष पुरवावे अन्यथा कामगारांची हक्काची बाजू अधू झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत कामगार व्यक्त करू लागले आहेत.
”प्रशासनाने सध्याच्या माथाडी बोर्डाच्या अध्यक्षांकडून पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाची अध्यक्षीय जबाबदारी नवीन अधिकाऱ्यांकडे दिली आहे. नवीन अध्यक्षांची एका महिन्यापूर्वीच या विभागात नियुक्ती झालेली आहे. मात्र, ते काही अज्ञात करणामुळे अजूनपर्यंत कार्यालयात रुजू झालेले नाहीत. आठवडाभरात ते कार्यालयाचा पदभार स्वीकारतील.” – डी. डी. पवार (सरकारी कामगार अधिकारी, पिंपरी चिंचवड माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ)…
याबाबत पिंपरी चिंचवड माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.