न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसें.) :- पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन व नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी कासारवाडी व चिखली येथे प्रकल्प प्रस्तावित असून, सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज ३१२ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रकल्प उभारणीसाठी शहरातील पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसी, चिखली, निगडी, प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी अशी चार भागांत विभागणी केली आहे. या प्रक्रीयासाठी आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लॉंड्री दुकाने, कुलिंग टॉवर, हाउसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी वापरण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने किंवा पीपीपी माध्यमातून उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन, हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.












