न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसें.) :- महापौर राहुल जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहरातील शाळांना अचानक भेटी दिल्या होत्या. या भेटीच्या अनुषंगाने शहरातील महापालिकांच्या शाळांचा दर्जा व गणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती
या सभेस शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, नगरसेविका संगिता भोंडवे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व शाळा आय. एस. ओ. व स्मार्ट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निरनिराळे प्रयोग राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या शाळेची पटसंख्या वाढावी, शाळेतील मुलांना सर्व स्मार्ट सुविधा मिळाव्यात, तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्हावा, याकरीता महापालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत.
शाळेतील शिक्षकांना व शाळांना काही अडचणी, समस्या असतील तर, त्या शिक्षण समिती सभापतींना सांगाव्यात. त्यावर निश्चितच उपाय योजना करण्यात येतील. समस्या असल्या तरी जबाबदारी टाळणे योग्य नाही. महापालिका सर्व शाळा स्मार्ट करणार आहे. शिक्षकांनीही स्मार्ट व्हावे. शिक्षकांना २५-३० वर्षाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी करावा. आजचे विद्यार्थी हे शहरातील उद्याचे भविष्य आहेत. शहरातील मनपा शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारणे महत्वाचे आहे. ते आपल्या सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करु.
पिंपरी चिंचवड शहराचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्वल करु. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चांगले निर्णय घेऊ, यापूढेही शाळांना अचानक भेटी देण्यात येतील. सर्व विद्यार्थी हे शाळेत टापटीपपणे येतील याकडे लक्ष द्यावे. शाळेमध्ये स्वच्छता ठवणे शिक्षकांची जबाबदारी आहे. शाळांसाठी आवश्यक ती सर्व सुविधा पुरविण्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात येतील. परंतू, शाळांचा दर्जा व गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच मनपा शाळेच्या सर्व शिक्षकांचा मेळावा येत्या १५ दिवसात आयोजित करण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले आहे.
प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी प्रास्ताविक केले.












