न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १५ डिसें.) :- आलिया मोहम्मद खान ही भोसरीतील भगतवस्ती परिसरातून गायब झालेली साडेचार वर्षांची मुलगी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळता खेळता घराबाहेर निघून गेली. घरात आई होती, परंतु आलिया नेहमीच घराबाहेर खेळत असल्यामुळे आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी आलिया घरात काही आली नाही. म्हणून आईने बाहेरजाऊन पाहिले असता आलिया दिसली नाही. तिचा शोध सुरू झाला. आलिया ही खान कुटुंबाची एकुलती एक मुलगी सापडत नसल्याने जीव कासावीस झाला होता. अलियाचा शोध घेण्यासाठी ते राहत असलेला भगतवस्ती परिसर शोधून काढला मात्र आलिया काही सापडली नाही.
अखेर पोलिसांची मदत घ्यायची असे आलियाचे वडिल मोहम्मद हैदर खान यांनी ठरवले. त्यानुसार रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात येऊन साडेचार वर्षीय आलिया अचानक खेळता खेळता घराबाहेर गेल्याची माहिती दिली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाला शोधायला सुरूवात केली.
आलिया नक्की कुठे गेली असेल, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरील सगळे सीसीटीव्ही तपासले. यात आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास त्या दिशेने जात दीड किलोमीटर अंतर कापलं आणि आलिया एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेली असल्याचे निदर्शनास आले. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांना मिळाले आहे .
या प्रकारानंतर तब्बल सात तासानंतर आलिया आपल्या आई-वडिलांना भेटली होती. याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्याचबरोबर डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. दोघांनी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेचे आभार मानले.












