- तेरा बुलेट व दोन इतर दुचाकीसह चोरट्यांच्या पोलिसांनी बांधल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ५० हजारांच्या १३ बुलेट आणि दोन अन्य दुचाकी हस्तगत केल्या. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
विशाल बाळासाहेब मगर (वय २०, रा. लेहणेवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), विशाल बंकट खैरे (वय २१, रा. भुतडाता, जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा मुख्य साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. घाटकोपर, मुंबई) याचा पोलीस शोध घेत आहेत.
वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल ढोबळे हा बुलेट दुचाकी चोरी करीत असल्याचे आढळले. अमोल याने चोरलेली एक बुलेट विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परिसरात येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. २४) सापळा लावून आरोपी मगर आणि खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. ती बुलेट त्यांचा मित्र ढोबळे याने चोरी करून त्यांना विक्रीसाठी दिली असून ढोबळे याने १२ बुलेट व इतर दोन दुचाकी जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पिंपरी – चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरून आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट व दोन अन्य दुचाकी अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण, भोसरी एमआयडीसी, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, पुणे ग्रामीण हददीतील राजगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हददीतील नेरळ, एपीएमसी, रबाळे, तसेच ठाणे शहर हददीतील कापुरबावडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.












