- पालिका आयुक्तांकडून अटी व शर्थी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, मात्र, सर्वाधिकार पालिका आयुक्तांना असतील असे, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. मात्र, पिंपरी चिंचवड पालिकेकडून राज्याच्या जाहीर तारखेनुसार शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम दिसून येत होता. पालिका आयुक्तांनी आज शाळांबाबत स्वतंत्र आदेश काढला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ पासुन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडील मार्गदर्शक सूचना अटींच्या अधिन राहुन सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
दिलेल्या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत स्वतंत्र मार्गदर्शक सुचना आदेशाचे ( SOP ) पालन करणे बंधनकारक राहील. शाळेत स्वच्छता व निर्जतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणेकामी Thermometer, Thermal Scanner Gun, Pulse Oximeter, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुची उपलब्धता असलेबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी. शाळा वाहतुक सुविधांचे निर्जंतुकीकरण नियमित होत असलेबाबत व याबाबत उपाययोजना केली आहे किंवा नाही याची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड -१९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक असुन चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक राहील. वर्गखोली तसेच स्टाफरुम मधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतर ( Physical Distance ) च्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.
शाळेत दर्शनी भागावर ( Physical Distance ), मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सुचना असणारे Posters / Stickers लावावे. अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरीता किमान ६ फुट इतके शारीरिक अंतर (Physical Distance ) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हें लावावीत. शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखण्यासाठी, येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणाच्या खणा कराव्यात, याबाबत शाळा व्यवस्थापन यानी कार्यवाही करणे आवश्यक राहील. विद्यार्थांनी शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावे. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थीती राहण्याकरीता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे वा स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जतुकीकरणा करणेत यावे, याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाची राहील. विद्यार्थांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातुन किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निजतुकीकरण करणेत यावे, याबाबत पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण यांनी योग्य ती खात्री करावयाची आहे. वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नयेत. Ventilation साठी वर्ग खाल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात याबाबत शाळा व्यवस्थापनाने काळजी घ्यावी. Ventilation नसलेल्या खोल्यांमध्ये वर्ग भरविणेत येऊ नयेत. शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने पुर्व तयारीसाठी शाळा प्रशासनाने त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक २७ जानेवारी २०२१ पासुन शाळेत उपस्थित राहणेबाबत सुचना द्याव्यात, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.