- शहरातील हातगाडी, स्टॉलधारकांना काहीसा दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात हॉकर्स झोनबाबत निर्णय होईपर्यंत कारवाई थांबविण्यात येईल. मात्र कमी जागेत व्यवसाय करावा व रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सोमवारी (दि. २५) यांनी केले.
शहरातील विविध चौकातील हातगाडी, स्टॉलधारकांवर शहर पोलिस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून खटले दाखल करण्यात येत होते. याबाबत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने महापालिका व सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांना पत्र दिले होते.
यावर सोमवारी बैठक झाली. महापालिका प्रशासनाच्या वेळ खाऊ धोरणामुळे विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. तो दूर करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. यावर लवकरच महापालिका व पोलिसांसमवेत बैठक होणार आहे, अशी माहिती महासंघाचे नखाते यांनी दिली.











