- पिस्तुल विकणाऱ्या टोळीचा एमपीतून पर्दाफाश; आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- भोसरी पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी रुपेश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली. आरोपीने ते पिस्तूल मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.
तेथील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बलवाडी, उमर्टी गावाजवळ जंगलात सापळा रचून पाठलाग करून पिस्तुलाचा मुख्य डिलर आरोपी रॉनी बरनाला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर रॉनीचा मध्यप्रदेशातील साथीदार कालू पावरा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींनाही अटक केली.
बबलूसिंग उर्फ राॅनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, पो. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव, मूळ रा. बडवाणी, मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी, मूळ रा. धुळे) उमेश अरून रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा. मुंढवा, पुणे), धिरज अनिल ढिगारे (रा. हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, मूळ रा. चीलोबा वस्ती, मलठण, ता. दौंड), माॅन्टी संजय बोथ उर्फ माॅन्टी वाल्मीकी (रा. नेहरू नगर, पिंपरी), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन), राहूल गुलाब वाल्हेकर (रा. भोर), संदीप आनंता भुंडे (रा. बावधन), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.