- पिंपळे सौदागरसह पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट बनवण्याची शपथ घेण्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे’ यांचे आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७. डिसें.) :- ‘शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन’ व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर परिसरातील गोविंद गार्डन येथे रविवार (दि. १६) रोजी “स्मार्ट सिटी प्रेझेंटेशन व नागरी संवाद” या उपक्रमाविषयी नागरिकांशी जनसंवाद व सादरीकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, राजन पाटील, स्मार्ट सिटीचे निळंकठ पोमण, नगरसेविका निर्मला कुटे, जयनाथ काटे, स्विकृत नगरसेक संदीप नखाते, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, वसंत काटे, चंदा भिसे, सितेश अग्रवाल, अमित तलाठी व सोसायटीतील अध्यक्ष, नागरिक आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, स्मार्ट सिटी बनवताना महापालिकेने अनधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा ती अगोदरच होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण वीज, रस्ते, पाणी यासारख्या इतर नागरी सुविधांवर त्यामुळे ताण पडतो. ज्या सुविधा शहरवासियांना मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत. शहरे स्मार्ट होण्यासाठी नागरिक व त्यांचे विचार स्मार्ट होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
नगरसेवक शत्रुघ्न यांनी पिंपळे सौदागर हा परिसर मुळातच स्मार्ट आहे. परंतु, हे शहर देशपातळीवर कसे स्मार्ट होईल? यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनीच पुढाकार घेऊन, पिंपळे सौदागरसह पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट बनवण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.












