पिंपरी (दि. १७. डिसें.) :- पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे खंबीर नेतृत्व व आत्ताचे भाजपवासी जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत उडी घेतल्याचा व्हिडीओ अलीकडेच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय चर्चा व विधानांना पेव फुटले असून, आझमभाई राष्ट्रवादीत गेल्याच्या व्हिडीओने भाजपच्या गोटात भयंकर व अवास्तव भीती तर राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड आनंद निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, या व्हिडीओ नाट्यावर पडदा पडला असून, ही फक्त अफवा असल्याचे सिध्द झाले आहे.
हा व्हिडिओ जुना असून, भाजपची राजकीय दिशाभूल करण्यासाठी हा जुना व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केल्याचे पानसरे समर्थकांनी सांगितले आहे. विविध प्रलोभने देऊन भाजपमध्ये आयात केलेले पानसरे आजकाल नाराज दिसतात. या नाराजीतून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही काहीजण खाजगीत सांगतात. त्यातच, आता शहराचे माजी कारभारी अजित पवार यांच्यासोबतचा पानसरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबबत बोलताना आझमभाईंचे कट्टर समर्थक नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, आझमभाई राष्ट्रवादीत जाणे शक्य नाही. ते भाजपमध्येच आहे. अजितदादां सोबतचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो जुना आहे. ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत परतलो. त्यावेळी अजितदादा माध्यमांसमोर बोलतानाचा तो व्हिडिओ आहे. ”भाईंनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा तर्क या व्हिडीओवरून लावणे चुकीचे आहे.”
थोडक्यात काय? तर, या व्हिडीओने आझमभाई पानसरे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार या अफवेचे शंका-निरसन झाले असले तरी, आझमभाई भाजपवर नाराज आहेत, अशी आतल्या गोटातून बातमी असल्याची चर्चा आहे. आझमभाई पानसरे हे खरेच स्वपक्षावर नाराज असतील व विरोधकांना योग्य संधी जर उपलब्ध झाली तर मात्र, आझमभाईंचा वारू रोखणे भाजपला अवघड ठरू शकते, असा राजकीय जाणकारांचा व्होरा असल्याची राजकीय माध्यमात दबक्या आवाजात चर्चा आहे.












