- खासगी वाहने २० वर्षांनी तर व्यावसायिक वाहनं १५ वर्षांनी जाणार ऑटोमेटेड सेंटरमध्ये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२१-२२ या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पातून व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीला मंजुरी देण्यात आल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
आपल्या जुन्या कारची वैधता किती दिवसांची राहिल किंवा आपली जुनी कार किती वर्षांपर्यंत वापरायची यासंदर्भातही निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली. जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जातील, त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात येईल. तेल आयात बिलातही कमी होणार असून ऑटोमेटेड फिटनेस सेंटर उभारण्यात येणार आहेत. आपल्या खासगी गाड्यांना २० वर्षांच्या वापरानंतर या सेंटरमध्ये जावे लागणार आहे. खासगी वाहनांना २० वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनी ऑटोमेटेड सेंटरमध्ये दाखल करावे लागणार आहे. जुन्या गाड्यांना रस्त्यावरुन हटविणे हाच या निर्णयाचा उद्देश असल्याचे सितारमण यांनी सांगितले.
व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू होते, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, १५ वर्षांच्या जुन्या गाड्यांमुळे प्रदुषण वाढते आणि त्यांची रिसेल किंमतही अतिशय कमी असते. रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मिनिस्ट्रीने या पॉलिसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, एप्रिल २०२२ पासून जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. सरकारने २०३० पर्यंत देश पूर्णपणे ई-मोबॅलिटी करण्याचे ध्येय ठेवले आहे. यातून देशात कच्च्या तेलाच्या आयात बिलात कमतरता आणणे हा आहे.


















